-
पै. सचिन बाबुराव पवार
- संस्थापक आणि अध्यक्ष
स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन, मल्हार प्रतिष्ठान

नम्र निवेदन
सन्माननीय बंधू आणि भगिनींनो , सप्रेम नमस्कार ,
गेले अनेक वर्ष मी स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन, मल्हार प्रतिष्ठान आणि विविध सेवाभावी, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करीत असलेल्या सामाजिक कार्याची आपणास माहिती आहे. माझ्या या सामाजिक कार्याला आपण सर्वांचे लाभलेले सहकार्य,मिळालेले पाठबळ निश्चितपणे माझे मनोबल वाढवणारे ठरले आहे. मी वेळोवेळी राबवलेल्या विविध उपक्रमांचा सदैव कौतुक करून मला प्रोत्साहित केलं. या प्रोत्साहनातून एक जनसंघटन झालं असून समाजसेवेचे हे कार्य आता एक जनहिताची चळवळ झाली आहे.
कधीकाळी लाल मातीत रमलेला मी आता समाजकार्यात रमलो आहे. हा वारसा मला माझ्या कुटुंबातूनच मिळाला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले माझे वडील स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार ग्रामपंचायत सदस्य होते, चुलते स्व. नामदेव पवार यांनी देखील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना या परिसरातील सर्वसामान्यांना दिलासा देणारे सामाजिक कार्य केले आहे. वारकरी सांप्रदाय परंपराहि आमच्या घराला लाभली असून माझे मामा संतसेवक मारुती कोकाटे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून संतसेवा करीत आहेत. आमच्या घराला कुस्तीचीही मोठी आवड आणि वारसा लाभला आहे. वडील स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार यांनी तालीम केलीच याशिवाय मलाही माझी कुस्तीची आवड लक्षात घेऊन प्रोत्साहित केलं. त्या प्रोत्साहनातूनच मी कोल्हापूर, नोयडा, दिल्ली, आदी ठिकाणी नामांकित कुस्ती प्रशिक्षण केंद्र व तालीम आखाडे सराव केला. तेथे घेतलेल्या मेहेनतीच्या जोरावर अनेक मैदाने मी गाजवली. कुस्तीत नाव कमावत असतानाच समाजकार्याची प्रेरणा मिळाली आणि मी सामाजिक कार्याच्या आखाड्यात दाखल झालो.
पर्यावरण जपणे हि सर्वात महत्वाची आणि आवश्यक बाब निर्माण झाली आहे. आपण आता याबाबत जागरूक सावध नाही झालो तर भविष्य होणाऱ्या दुष्परिणाम आणि नुकसानीला आपणच जबाबदार असू. आणि त्यामुळे भावी पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही. म्हणूनच अत्यंत जागरूकपणे मी सर्वप्रथम आणि व्यापक स्वरूपात हाती घेतलेले काम म्हणजे वृक्षारोपण. हे काम करताना वाढदिवसाला भेट म्ह्णून झाडाचं रोपटं भेट देण्याची अनोखी संकल्पना मी राबवली. या संकल्पनेतून आत्तापर्यंत सहा हजार पेक्षा जास्त रोप भेट म्हणून मिळालेल्या झाडांच्या मोठ्या आपुलकीने संवर्धन होताना दिसून येत आहे. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येकवेळी मदतीचा हात पुढे करताना मी माझे एक पाऊल पुढेच ठेवले आहे. अंध, अपंग, दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी जे जे म्हणून करता येईल ते ते सर्व करण्याचा माझा सदैव प्रयत्न राहिला आहे. मी माझा शेती दुग्ध व्यवसाय करतानाच आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येक गरजेच्या ठिकाणी मदतीसाठी उभा राहत आहे आणि यापुढेही राहणार आहे.
समाजकार्याबरोबर राहत्या परिसराचं विकास केला तर रस्ते, पाणी, वीज, स्वछता या बाबतीत विकास होणे आवश्यक आहे मात्र त्यासोबत विकासाची संकल्पना या मूलभूत सुविधांच्या पलीकडे किती तरी मोठी आहे आणि त्या संकल्पनेतील विकास मालात समाजकारणासोबत साधायचा आहे. सामाजिक परिस्थितीची जाण मनात ठेऊन सर्वाना सोबत घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहील. या प्रयत्नांना आपले सहकार्य, आशीर्वाद, प्रेम आणि पाठबळ माझ्या पाठीशी कायम ठेवावे, हे नम्र विनंती.
आपला विश्वासू,
सचिन बाबुराव पवार.
